ग्रामस्थांमधून समाधान
दोडामार्ग : प्रतिनिधी
कळणे येथील सड्यावर एका अज्ञात व्यक्तीने मृत गाय आणि वासरू उघड्यावर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. उघड्यावर ही मृत जनावरे टाकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
या प्रकाराची माहिती मिळताच कळणे सरपंच अजित देसाई आणि सामाजिक कार्यकर्ते संदेश देसाई यांनी तात्काळ दखल घेतली. ग्रामपंचायत कर्मचारी सखाराम शिंदे आणि रामा कांबळे तसेच पोलीस पाटील कल्पेश जाधव यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ जेसीबी पाचारण केला.
सड्यावरच जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून या दोन्ही मृत जनावरांची रीतसर आणि सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यात आली. ग्रामपंचायतीने दाखवलेल्या या तत्परतेमुळे परिसरातील दुर्गंधीचा प्रश्न तात्काळ सुटला आहे. स्थानिक ग्रामस्थांमधून या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, अशा प्रकारे उघड्यावर मृत जनावरे टाकून प्रदूषण व रोगराई पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याची मागणीही होत आहे.













