झरेबांबर येथे उद्या वनराई बंधारा उपक्रम; प्रत्यक्ष श्रमदानातून जलसंवर्धनाचे तहसीलदार दोडामार्ग यांचे आवाहन

पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बंधाऱ्याचे बांधकाम; लोकसहभागातून जलसमृद्धीचा संकल्प

दोडामार्ग (सुहास देसाई ):

पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याची सुरक्षितता जपण्यासाठी लोकसहभागातून जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता झरेबांबर (ता. दोडामार्ग) येथे पालकमंत्री ना. नितेशजी राणे जिल्हाधिकारी तुप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधारा बांधण्याचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्यक्ष श्रमदानातून सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार दोडामार्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जलसंधारणाचे कार्य केवळ शासन पातळीवर मर्यादित न राहता लोकसहभाग आणि सामूहिक श्रमदानातून अधिक प्रभावी ठरते. वनराई बंधारा हा केवळ पाणी अडविण्याचा उपक्रम नसून, सामाजिक एकजूट आणि पर्यावरण संवर्धनाचा एक महत्त्वपूर्ण संदेश देणारा उपक्रम आहे. आगामी पिढीसाठी पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या जलसंवर्धनाच्या लोकचळवळीत तालुक्यातील पत्रकार बांधव, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गट, युवक, शेतकरी व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

सदर वनराई बंधारा श्रमदान

स्थळ झरेबांबर, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग येथे दि.शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ दुपारी २:०० वाजता पालकमंत्री जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत होणार आहे

 

“थेंब थेंब पाणी वाचवूया! श्रमदानातून जलसमृद्ध दोडामार्ग घडवूया!” असा संदेश देत या उपक्रमात सर्व घटकांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी केले आहे.