देवरूख (प्रतिनिधी)
देवरूखजवळील प्रसिद्ध श्री टिकलेश्वर देवस्थान हे रत्नागिरी जिल्ह्यातील भाविक आणि पर्यटकांचे श्रद्धास्थान असून वर्षभर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. विशेषतः पावसाळा आणि श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते.
सध्या बहुतांश पर्यटक प्रवासासाठी गुगल मॅपचा वापर करतात. मात्र, श्री टिकलेश्वर मंदिराचा शोध घेतल्यास गुगल मॅप मुख्य मार्गाऐवजी अमृतनगर (गुरुकुल नगर)-पेंढारी-काजरेकर मार्गे कच्च्या व अरुंद गल्लीतून मार्ग दाखवत असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. हा मार्ग पुढे हेमंत शिंदे यांच्या दुकानाजवळ तळवडे रस्त्याला मिळतो. सध्या पावसाळ्यात या कच्च्या मार्गावर चिखल साचल्यामुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविणे अत्यंत कठीण होत आहे. तसेच अरुंद रस्त्यामुळे चारचाकी वाहने अडकण्याच्या घटना घडत असून पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रत्यक्षात श्री टिकलेश्वर मंदिराकडे जाणारा मुख्य आणि सुरक्षित मार्ग देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूलसमोरील तळवडे फाट्यावरून जातो. मात्र, या ठिकाणी नगरपंचायतीने पूर्वी बसविलेला दिशादर्शक फलक तुटलेल्या अवस्थेत असून, तेथील माहिती फलकावरील अक्षरेही अस्पष्ट झाली आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल होत आहे. यामुळे देवरूख नगरपंचायतीने न्यू इंग्लिश स्कूलजवळील तळवडे फाट्यावर तातडीने मोठा, स्पष्ट व आकर्षक दिशादर्शक फलक उभारावा, तसेच संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून गुगल मॅपवरील मार्गदर्शनही योग्य मार्गानुसार अद्ययावत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी भाविक आणि नागरिकांकडून होत आहे. यामुळे श्री टिकलेश्वर देवस्थानाकडे येणाऱ्या पर्यटक व भाविकांचा अनावश्यक त्रास टळून त्यांना सुरक्षित आणि योग्य मार्गाने मंदिरापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल.













