सिद्धार्थनगर स्मशानभूमीत लाकडाची व्यवस्था
मात्र कायमस्वरूपी सुविधांची मागणी कायम
गौतम खुडकर यांनी मानले प्रशासनाचे आभार
वीज व संरक्षण भिंतीच्या कामाची तातडीची मागणी
कणकवली : शहरातील सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांबाबत माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने स्मशानभूमीतील लाकूड गोडाऊनमध्ये लाकडाची व्यवस्था केली आहे. या कार्यवाहीबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त करत, ही व्यवस्था केवळ तात्पुरती न राहता कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी गौतम खुडकर यांनी केली आहे.
यावेळी भूषण कांबळे, गौतम हिंदळेकर, विनायक तांबे, मिखील कांबळे आणि रोहित कांबळे उपस्थित होते.
श्री. खुडकर यांनी सांगितले की, स्मशानभूमीत अनेक महिन्यांपासून वीजपुरवठा बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची आवश्यकता आहे. तसेच स्मशानभूमीच्या बाजूने नदी वाहत असल्याने भविष्यात शेडला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संरक्षण भिंतीचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशासनाने लाकडाची व्यवस्था करून सकारात्मक पाऊल उचलले असले, तरी स्मशानभूमीतील उर्वरित मूलभूत सुविधाही तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी कायमस्वरूपी लाकूड व्यवस्था, नियमित वीजपुरवठा आणि संरक्षण भिंतीचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.













