ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांच्या निधनानिमित्त देवगड तालुका पत्रकार समितीची शोकसभा

देवगड : ज्येष्ठ पत्रकार तथा देवगड तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष दयानंद मांगले यांच्या निधनानिमित्त देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने आज शोकसभेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या अध्यक्षतेखाली ही शोकसभा पार पडली.

यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके, जिल्हा सदस्य प्रशांत वाडेकर, उपाध्यक्ष अनिल राणे, तालुका सचिव दिनेश साटम, सहसचिव सचिन लळीत, माजी अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सदस्य सुरज कोयंडे, राजीव पडवळ, स्वप्निल लोके, नागेश दुखंडे बंड्या उर्फ श्रीकृष्ण रानडे तसेच तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दयानंद मांगले यांच्या निधनामुळे पत्रकारितेत न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांचे जाण्याचे वय नव्हते. पत्रकारांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त त्यांनी केली.

तालुकाध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेणारा एक सक्षम पदाधिकारी आपण गमावला असून, त्यांच्या निधनामुळे पत्रकार संघटनेचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली.

जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके यांनी दयानंद मांगले हे उत्तम मित्र, अभ्यासू पत्रकार आणि अनेकांसाठी मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याचे नमूद केले.

जिल्हा सदस्य प्रशांत वाडेकर यांनी मांगले यांचे विविध शासकीय विभागांशी उत्तम संबंध होते. एक आदर्श, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारा पत्रकार आपण गमावल्याचे सांगितले.

माजी अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांनी दयानंद मांगले यांचे सर्व स्तरांतील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते अजातशत्रू पत्रकार होते आणि त्यांच्या निधनाने पत्रकारितेची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली.

शेवटी दिवंगत दयानंद मांगले यांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळले. प्रास्ताविक तालुका सचिव दिनेश साटम यांनी केले.