सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दखल; न्हावेली-रेड्डी मार्गावरील धोकादायक वळणावर संरक्षक भिंतीचे काम पूर्ण

न्हावेली – श्रेयस गावडे.

सावंतवाडी-न्हावेली रेड्डी मार्गावर अत्यंत आवश्यक असलेल्या आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या संरक्षक भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडून अखेर तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

सदर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते, मात्र रस्त्याची साईड पट्टी कोसळल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला होता. या कोसळलेल्या साईड पट्टीमुळे येथे केव्हाही मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. या गंभीर समस्येकडे ‘प्रहार’ वृत्तपत्र आणि इतर प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ही परिस्थिती ओळखून न्हावेली येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय पारसेकर, सरपंच संघटना अध्यक्ष (कास) प्रवीण पंडीत, निगुडे येथील माजी उपसरपंच गुरुदास गंवडे आणि न्हावेली गावातील सक्रिय युवावर्गाने एकत्र येत प्रशासनाकडे धाव घेतली होती. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या मार्गावर तातडीने मजबूत संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशी आग्रही मागणी करणारे निवेदन प्रत्यक्ष भेटून दिले होते.

 

या निवेदनाची, लोकभावनांची आणि माध्यमांमधील वृत्ताची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या अभियंता सौ. पूजा इंगळे मॅडम यांनी घेतली. त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले आणि युद्धपातळीवर या भिंतीचे काम मंजूर करून ते पूर्ण करून घेतले. काम पूर्ण होण्यापूर्वीची रस्त्याची अत्यंत बिकट आणि धोकादायक अवस्था लक्षात घेता, आता झालेल्या मजबूत दगडी बांधकामामुळे हा रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाला आहे. यामुळे संभाव्य मोठे अपघात टळणार असून प्रवाशांचा प्रवास आता सुकर होणार आहे.

 

मागणीची तात्काळ दखल घेऊन तत्पर सेवा दिल्याबद्दल अक्षय पार्सेकर , प्रवीण पंडीत, गुरुदास गंवडे आणि न्हावेली ग्रामविकास युवावर्गाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अभियंता सौ. पूजा इंगळे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच या समस्येला वेळोवेळी वाचा फोडल्याबद्दल ‘प्रहार’ वृत्तपत्र आणि इतर सर्व माध्यमांचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहेत. प्रशासनाचे आणि माध्यमांचे असेच सकारात्मक सहकार्य लाभल्यास ग्रामविकासाचे उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.