शासन स्तरावर चौकशी व्हावी, भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य श्रीकृष्ण हेगिष्टे यांची मागणी
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील कोर्ले- प्रभानवल्ली खोरनिनको ,व्हेळ- रिंगणे पाचल आणि रिंगणे -कोंडगे कुरंग या तीन प्रमुख राज्य मार्गांसाठी शासनाकडून दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी हजारो रुपयांचा निधी मिळत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केले जात असून यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासन स्तरावरून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी , अशी मागणी माझी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी केली आहे.
याबाबत हेगिष्टे यांनी सांगितले की कोर्ले प्रभानवल्ली खोरनिनको , व्हेळ रिंगणे पाचल आणि रिंगणे कोंडगे कुरंग या तीन प्रमुख राज्य मार्गांसाठी. राज्य शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी येतो. स्थानिक प्रशासनाच्या चालढकल भूमिकेमुळे या रस्त्यांची दुरावस्था झालेली दिसून येते. या तीनही रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून झाडांच्या फांद्या या रस्त्यावर येतआहेत. त्यामुळे समोरच्या वाहनाला दिसत नसल्याने गत एकाच आठवड्यात दोन अपघात झालेले आहेत. वास्तविक पाहता देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी येणाऱ्या निधीतून रस्त्यावरील झाडे फाद्या तोडायच्या असतात. रस्त्यावर पडणारे खड्डे हे पावसाळ्यात जांभ्या दगडाने तर उन्हाळ्यामध्ये डांबराने भरावयाचे असतात. मात्र प्रभानवल्ली येथे रस्त्यावरील पाच ते सहा, कोर्ले ब्रिज दोन तीन खड्डे भरून बाकीचे खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे खड्डे भरण्याचे काम हे इतके निकृष्ट असते की खड्डे भरून झाल्यानंतर चार-पाच दिवसात पुन्हा खड्डे दिसू लागतात.
. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग लांजाकडे वारंवार तक्रारी तसेच माहिती देऊनही त्यांच्याकडून कार्यवाही होत नाही. रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर होत नसल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी केवळ साईड पट्टीवरचे गवत काढले जाते. मात्र झाडी तोडली जात नाही. आणि वाढलेली झाडी ही वाहनांच्या अपघातात कारणीभूत ठरत आहे.
अशा प्रकारे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लाखो रुपये येत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाच्या उदासीन भूमिकेमुळे सद्यस्थितीत वरील तीनही रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने नादुरुस्त आणि धोकादायक बनले आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी केली आहे.












