शासनाच्या सुधारित आदेशानुसार सरपंचपदाच्या आरक्षणात बदल; विजयदुर्ग ग्रामपंचायत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित

देवगड, :महाराष्ट्र शासनाने सरपंचपदाच्या आरक्षणासंदर्भात जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देवगड तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणात फेरबदल करण्यात आला आहे. तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींपैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग (न.मा.प्र.) यांच्यासाठी राखीव असलेले एक सरपंचपद कमी करण्यात आले असून त्याऐवजी खुल्या प्रवर्गातील एक जागा वाढविण्यात आली आहे.

 

या बदलाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देवगड तहसील कार्यालयात आरक्षणाची फेरसोडत पार पडली. या सोडतीत विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल जाधव यांनी जाहीर केले.

यावेळी नायब तहसीलदार संतोष खरात आणि विवेक शेठ यांनीही प्रक्रियेत सहभाग घेतला.