आंबोलीतील धबधबा परिसरातील ५ किमीचा रस्ता वाहतूक कोंडीमुक्त ठेवा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी

सावंतवाडी:वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत शनिवार आणि रविवारी होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता धबधबा परिसरातील किमान पाच किलोमीटरचा रस्ता वाहतूक कोंडी विरहित ठेवावा, जेणेकरून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडथळा होणार नाही, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे केली.

श्री. साळगावकर यांनी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांची भेट घेऊन आंबोलीतील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. आंबोलीत शनिवार व रविवारी पर्यटक रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने उभी करतात. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला बेळगावसारख्या ठिकाणी उपचारासाठी नेणे कठीण होऊन बसते. दोन दिवसांपूर्वी सर्पदंश झालेल्या एका पर्यटकाला वाहतूक कोंडीमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

यावर स्पष्टीकरण देताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले की, संबंधित पर्यटकाचा मृत्यू वाहतूक कोंडीमुळे झालेला नाही. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्सला कोणताही अडथळा निर्माण झाला नव्हता. पर्यटकांच्या अतिउत्साही आणि मद्यधुंद वर्तनावर कारवाई करताना पोलीस प्रशासनाची बदनामी केली जात असल्याचे सांगत, सावंतवाडी पोलीस ठाण्यात ३० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून १०० अतिरिक्त पोलीस कर्मचारी मिळायचे, मात्र सध्या अपुऱ्या बळावरच सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

शनिवार व रविवारी वाहतुकीस अडथळा ठरणारी अवजड वाहने रोखावीत आणि स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन पार्किंगबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना साळगावकर यांनी केली. यावर ग्रामपंचायतीकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करत वनविभागाचे कर्मचारीही केवळ धबधब्यापुरतेच सीमित असतात, असे मगदूम म्हणाले. तरीही आंबोली, चौकुळ आणि गेळे पर्यटनावर पोलीस लक्ष ठेवून असून मिळालेल्या सूचनांनुसार वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, माजी नगरसेवक विलास जाधव यांनीही विविध सूचना मांडल्या. सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडीबाबतही लक्ष वेधण्यात आले असता, पालिका प्रशासनाकडून नियमावली तयार केली जात असून ती पूर्ण होताच शहरातील वाहतूक कोंडीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे श्री. मगदूम यांनी स्पष्ट केले.