मोरया… मोरया’चा अखंड गजर, तुफान गर्दी…
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर:ढोल-ताशांचा गजर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटक्यांची आताषबाजी, ‘मोरया.. मोरया’ असा अखंड जयघोष, आकर्षक रांगोळी आणि हजारो कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी रंकाळा वेस येथील गोल सर्कल मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सायंकाळी कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मुंबईच्या लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीचे दर्शन पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील भाविकांना घेता यावे. यासाठी रंकाळा स्टॅन्ड येथील रंकाळवेस गोल सर्कल मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून लालबागच्या राजाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत असते. ही मूर्ती मुंबई येथून कोल्हापुरात आणली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कोल्हापूरच्या राजाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. विशेष म्हणजे हा राज्यातील सर्वात पहिला गणपती आगमन सोहळा असतो. कोल्हापूरच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी हजारो कोल्हापूरकर दुपार पासूनच तावडे हॉटेल चौकात जमले होते. यामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गणेशोत्सवाला अद्याप सव्वा महिना असतानाच बाप्पाच्या आगमनाने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
२५ हून अधिक ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आगमन सोहळ्याचे चित्रीकरण केले. मोबाइलवर फोटो आणि थेट प्रक्षेपण करण्यासाठी तरुणाईची मोठी लगबग दिसून आली. लहान मुलांसह महिलांचाही मोठा सहभाग होता.
सायंकाळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, पुष्पराज क्षीरसागर यांनी ‘श्रीं’चे दर्शन घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले.
सांगली फाटा, उजळाईवाडी, शिवाजी विद्यापीठ मार्ग तसेच महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, गृहरक्षक दल, राज्य राखीव दलासह वाहतूक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.












