राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सेवानिवृत्त प्राध्यापकांचा सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापक आणि शिक्षकांनी शिक्षण ही सेवा समजून घेतलेल्या अपार मेहनतीमुळेच आज या प्रशालेचे विद्यार्थी देश-विदेशात महत्त्वाच्या आणि उच्च हुद्द्यांवर कार्यरत आहेत, असे गौरवोद्गार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी काढले.
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभागातर्फे गुरुपौर्णिमा आणि ज्युनिअर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
प्रशालेच्या सभागृहात पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. सावंत पुढे म्हणाले की, इथल्या गुणवंत शिक्षकांकडून शिक्षण घेण्याचे भाग्य मला स्वतःला लाभले याचा मला अभिमान आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर अशा मार्गदर्शक गुरुजनांचा गौरव करण्याची संधी मिळणे ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
या सोहळ्यात सेवानिवृत्त माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, डॉ. दिनेश नागवेकर, नारायण देवरकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, धीरेंद्र होळीकर, सुरेश म्हसकर, सतीश बागवे, काकासाहेब चौगुले, एल. पी. पाटील, प्रवीण बांदेकर आणि आर. के. संकपाळ या प्राध्यापकांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्था सचिव व्ही. बी. नाईक यांनी स्व. भाईसाहेब सावंत व स्व. विकास सावंत यांच्या योगदानाची आठवण करून दिली. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्र. प्राचार्या डॉ. सुमेधा नाईक धुरी यांनी प्रास्ताविक केले, प्रा. माया नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. वामन ठाकूर यांनी आभार मानले.











