जिल्हा वार्षिक योजनेतून देवगड व कणकवलीतील अंगणवाड्यांच्या कामांना मंजुरी
देवगडमधील नऊ अंगणवाड्यांसाठी सुमारे ₹22 लाखांचा निधी
अंगणवाडी सेविकांकडून पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार
देवगड : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत देवगड व कणकवली तालुक्यातील अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्ती व नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. या मंजुरीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंगणवाडी दुरुस्तीच्या कामांना गती मिळणार असून देवगड-जामसंडे शहरातील नऊ अंगणवाड्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या मंजुरीनंतर अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत देवगड तालुक्यातील साटमवाडी, वडांबा, टिळकनगर, मळई, भटवाडी, किल्ला, तरवाडी, वेळावाडी आणि बाजारपेठ येथील अंगणवाड्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी सुमारे ₹22 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी अंगणवाडी सेविका आदिती केळकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, गेल्या दोन-चार वर्षांपासून अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी सातत्याने प्रस्ताव पाठविले जात होते. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे कामे मंजूर होत नव्हती. पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी या कामांचा सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवून दिली. त्यामुळे बालकांना सुरक्षित व सुस्थितीत अंगणवाड्यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी, सुपरवायझर आंबवले मॅडम तसेच नगरसेवक व नगरसेविकांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या अंगणवाडी दुरुस्ती मंजुरीचे पत्र भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सचिव योगेश चांदोसकर, शहराध्यक्ष वैभव कळंगुटकर, गटनेते शरद ठुकरुल तसेच अंगणवाडी सेविका व कार्यकर्ते उपस्थित होते.












