३०० गुणवंत विद्यार्थी आणि ४० हून अधिक शिक्षकांचा होणार गौरव
सावंतवाडी, प्रतिनिधी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने “गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा – २०२६” या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपरिषद सभागृहात करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव, शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात इयत्ता १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह १०० टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० हून अधिक शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, एकूण ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थी या सोहळ्यात गौरविले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
या सोहळ्याच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणे, उत्कृष्ट शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे तसेच शिक्षण संस्था, पालक आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे, हा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.












