गावाचे सौंदर्य अबाधित ठेवावे, जीवनमान धोक्यात आणू नये; ‘एम-सॅन्ड’ प्रकल्पाविरोधात केर-भेकुर्ली ग्रामस्थ आक्रमक

प्रशासनाविरोधात एकजूट; दोडामार्ग तालुक्यात ‘एम-सॅन्ड’ प्रकल्प लादू न देण्याचा ग्रामस्थांचा इशारा

दोडामार्ग:प्रतिनिधी 

 

गावच्या लगतचे समृद्ध जंगल उद्ध्वस्त करून लादला जाणारा ‘एम-सॅन्ड’ (M-Sand) प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही, असा इशारा देत गुरुवारी सकाळी केर – भेकुर्ली येथील ग्रामस्थ प्रशासनाविरोधात एकवटले आहेत. केर गावाचा डोंगर ही नैसर्गिक आणि अमाप संपत्ती असून, गावाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी तसेच ग्रामीण भागाचे जीवनमान धोक्यात येऊ नये यासाठी हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

केर गावातील डोंगररांगा आणि निसर्गसंपन्न परिसर ही या भागाची खरी ओळख आहे. मात्र, प्रस्तावित एम-सॅन्ड प्रकल्पामुळे येथील जंगलाचा विनाश होऊन पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी आधीच तहसीलदारांकडे लेखी निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.

 

निसर्ग सौंदर्य जपणे आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य व जीवनमान सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने लक्ष घालून हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्याकडे करणार असल्याचे ग्रामस्थ यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावनांचा अनादर करून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी केर-भेकुर्ली ग्रामस्थांनी दिल आहे