महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘तिरंगा प्रभागसंघ इन्सुली’ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

बांदा: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ‘तिरंगा प्रभागसंघ, इन्सुली’ची आर्थिक वर्ष सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी बांदा येथील सोसायटी हॉलमध्ये उत्साहात पार पडली.

सभेची सुरुवात प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या सभेचे अध्यक्षस्थान प्रभागसंघ अध्यक्ष सौ. वंदना देसाई यांनी भूषविले. उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकारी समिती सदस्यांचे प्रभागसंघाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

या सभेस प्रभागसंघ अध्यक्ष सौ. वंदना देसाई, सचिव शुभांगी मुळीक, कोषाध्यक्ष प्राची कुणकेरकर यांच्यासह इतर कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते. तसेच कास ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. श्रेया राणे, इन्सुलीच्या पोलीस पाटील सौ. जागृती गावडे, प्रभाग समन्वयक श्रीम. सुनिता मेस्त्री, कृषी व्यवस्थापक श्रीम. प्रिया गावडे, बीआरपी (BRP) सौ. प्राची राऊळ, कॅडरमधून ग्रामसखी, प्रेरिका, सर्व ग्रामसंघ लिपिका आणि प्रभागसंघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या कामकाजात सचिव सौ. शुभांगी मुळीक यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले, ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यानंतर कोषाध्यक्ष प्राची कुणकेरकर यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा जमा-खर्च आणि उत्पन्न विवरण स्पष्ट केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘तिरंगा प्रभागसंघ इन्सुली’च्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे अनावरण करण्यात आले.

त्यानंतर कोषाध्यक्षांनी आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ चा ताळेबंद व अंदाजपत्रक सादर केले. पुढील पाच वर्षांचे ध्येय निश्चित करताना व्हिजन डॉक्युमेंट्स, प्रभागसंघाचा ‘एएपी’ (AAP) आणि ‘बीडीपी’ (BDP) स्पष्ट करण्यात आला व त्यास मान्यता देण्यात आली.

या कार्यक्रमात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समूहांचा, तसेच ‘पीआरआय-सीबीओ कन्व्हर्जन्स’ (PRI-CBO Convergence) अंतर्गत स्थापित बालसभा पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सभेतील प्रमुख मान्यवरांनी प्रभागसंघाच्या भविष्यकालीन धोरणावर मोलाचे मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील वाटचालीस व कामास शुभेच्छा दिल्या.

सभेचे सूत्रसंचालन सौ. धनश्री गवस यांनी केले. अध्यक्षीय भाषणानंतर शेवटी प्रभागसंघाच्या वतीने वेदांती गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘वंदे मातरम्’ने सभेची सांगता झाली.