करिअर कट्टाच्या देवगड तालुका समन्वयकपदी प्रा. अक्षता मोंडकर

शिरगाव (प्रतिनिधी) : 

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमाच्या देवगड तालुका समन्वयकपदी शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अक्षता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात २८ जुलै रोजी आयोजित करिअर कट्टाच्या एकदिवसीय विभागीय कार्यशाळेत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

प्रा. मोंडकर या करिअर कट्टा उपक्रमाच्या राज्यस्तरीय स्टेट रिसोर्स सेंटर उद्योजकता विकास समितीच्या तसेच राज्यस्तरीय करिअर संसद समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना करिअर कट्टा आधुनिक सावित्री पुरस्कार–२०२६ प्रदान करण्यात आला असून, सलग दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

याशिवाय मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या सन २०२४-२५ च्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक, संघटनात्मक आणि नेतृत्वक्षम कार्याची दखल घेत करिअर कट्टा अंतर्गत देवगड तालुक्यातील विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे तसेच जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. मोंडकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या निवडीबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधीक्षक सुधीर साटम तसेच प्राचार्य समीर तारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.