न्यायालयीन सतर्कतेच्या नावाखाली कायदेमंडळाच्या अधिकारांवर अतिक्रमण नको

सावंतवाडीत ‘लेक्स डिस्कशन’ व्याख्यानमालेत ॲड. प्रशांत चिटणीस यांचे मत

​सावंतवाडी:
सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या व्याख्यानमालेतील दहावे पुष्प सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात मोठ्या उत्साहात पार पडले. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध वकील ॲड. प्रशांत चिटणीस यांनी उपस्थित वकील वर्ग आणि विधी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी ‘न्यायालयीन सतर्कता’ अर्थात ज्युडिशिअल ॲक्टिव्हिझम या विषयावर अत्यंत अभ्यासू आणि स्पष्टवक्तेपणाने आपले विचार मांडले.

​आपल्या व्याख्यानात ॲड. चिटणीस यांनी न्यायिक सक्रियतेच्या विविध पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला. कायदेमंडळ आणि कार्यपालिका जेव्हा आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरतात, तेव्हा न्यायव्यवस्था नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी पुढे येते. अशा वेळी नवीन कायदे सुचवणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल सुचवणे म्हणजे ‘न्यायालयीन सतर्कता’ होय. भारतात न्यायमूर्ती पी. एन. भगवती आणि न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी जनहित याचिकेच्या माध्यमातून या संकल्पनेचा पाया रचला, ज्यामुळे सामान्य माणसाला न्यायालयात दाद मागणे सोपे झाले. ॲड. चिटणीस यांनी ‘केशवानंद भारती’ आणि ‘मेनका गांधी’ विरुद्ध भारत सरकार यांसारख्या ऐतिहासिक खटल्यांचे उदाहरण देऊन संविधानाच्या मूळ संरचनेचे रक्षण किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले.

मात्र, न्यायालयीन सक्रियतेचे समर्थन करतानाच त्यांनी यातील मर्यादांवरही बोट ठेवले. न्यायालयीन सक्रियता लोकशाहीसाठी पोषक असली तरी ती ‘न्यायिक अतिरेक’ ठरू नये. बऱ्याचदा या नावाखाली न्यायालये कायदेमंडळ किंवा कार्यपालिकेच्या अधिकारांवर नकळत अतिक्रमण करताना दिसतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेने स्वतःवर काही मर्यादा घालणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. सर्वोच्च आणि उच्च न्यायालये कित्येकदा पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी करण्याऐवजी नवीन कायद्याची गरज भासवून मोठेपणा मिळवण्याचा प्रयत्न करतात, याकडे लक्ष वेधत त्यांनी स्पष्ट केले की, सध्या उपलब्ध असलेल्या कायद्यांचा योग्य वापर केला तरी समाजात मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो. त्यांच्या या विचारप्रवर्तक मांडणीमुळे उपस्थितांचा न्यायालयांच्या निर्णयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली.
​व्याख्यानानंतर आयोजित प्रश्नोत्तराच्या चर्चासत्रात ॲड. प्रशांत चिटणीस यांनी वकील आणि विधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.

​प्रारंभी, सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर आणि वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी बाबुराव रणशूर यांच्या हस्ते प्रमुख वक्ते ॲड. प्रशांत चिटणीस यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास सावंतवाडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. कांबळे, जिल्हा महिला उपाध्यक्ष ॲड. नीता गावडे, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, ॲड. परशुराम चव्हाण, ॲड. पंकज आपटे, ॲड. अभिषेक चव्हाण, ॲड. अलका कासकर, ॲड. प्रतीक्षा भिसे, ॲड. विनय गावडे, ॲड. स्वप्नील कोरगावकर, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. वामन निर्गुण यांच्यासह मोठ्या संख्येने वकीलवर्ग आणि विधी विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

​सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सावंतवाडी वकील संघटनेच्या उपाध्यक्ष (महिला) ॲड. सिद्धी परब यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी मानले.