वेलंकन्नी यात्रेसाठी वास्को-द-गामा येथून विशेष रेल्वे

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेचा निर्णय; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विशेष फेऱ्या

 

वास्को-द-गामा : वेलंकन्नी येथील प्रसिद्ध ‘अवर लेडी ऑफ गुड हेल्थ’ वार्षिक उत्सवासाठी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेने वास्को-द-गामा ते वेलंकन्नी आणि वेलंकन्नी ते वास्को-द-गामा दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ मध्ये धावणार आहेत.

 

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०७३६१ वास्को-द-गामा-वेलंकन्नी एक्स्प्रेस विशेष २७ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी रात्री ९.५५ वाजता वास्को-द-गामा येथून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता वेलंकन्नी येथे पोहोचेल.

 

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०७३६२ वेलंकन्नी-वास्को-द-गामा एक्स्प्रेस विशेष २९ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता वेलंकन्नी येथून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता वास्को-द-गामा येथे पोहोचणार आहे.

 

याशिवाय गाडी क्रमांक ०७३६५ वास्को-द-गामा-वेलंकन्नी एक्स्प्रेस विशेष ६ सप्टेंबर रोजी रात्री ९.५५ वाजता वास्को-द-गामा येथून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता वेलंकन्नी येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०७३६६ वेलंकन्नी-वास्को-द-गामा एक्स्प्रेस विशेष ९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता वेलंकन्नी येथून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता वास्को-द-गामा येथे दाखल होईल.

 

या विशेष गाड्यांना मडगाव, सावर्डे-कुडचडे, कुळे, कॅसल रॉक, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, बिरूर, अरसीकेरे, तुमकुरू, एसएमव्हीटी बंगळुरू, कृष्णराजपुरम, बंगारपेट, सालेम, नमक्कल, करूर, तिरुचिरापल्ली, तंजावूर, तिरुवारूर आणि नागपट्टिनम या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

 

१९ डब्यांची विशेष गाडी

 

या विशेष रेल्वेला एकूण १९ डबे असतील. त्यामध्ये ३ टियर एसीचे ६ डबे, स्लीपरचे ७ डबे, जनरलचे ४ डबे, एक जनरेटर कार आणि एक एसएलआर डबा असणार आहे.

 

वेलंकन्नी उत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी या विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.