चिपळूण (वार्ताहर) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाअंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय येथील कृषी विद्यार्थिनींचे कुटरे गावात आगमन झाले आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थिनी गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.
या उपक्रमांतर्गत सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गांडूळ खत व कंपोस्ट खत निर्मिती, पीक संरक्षण, फळबाग व्यवस्थापन, मृदा व पाणी संवर्धन तसेच विविध शासकीय कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. याशिवाय शेतभेटी, प्रात्यक्षिके, माहिती केंद्र, वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कुटरे येथे विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासक संजीवकुमार गुजर यांनी विद्यार्थिनींचे स्वागत करून त्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील शेतकऱ्यांनी विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या ग्रामीण कृषी कार्यानुभवात शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते येथील श्रुती येरलकर, ऋतुजा गायकवाड, ईश्वरी कुरणे, मनस्वी पाटील, अंशिता फडतरे या विद्यार्थीनी सहभागी झाल्या आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी नवीन माहिती मिळणार आहे. विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनाचा गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.








