धामणवणे गावचे माजी सरपंच संभाजी जाधव यांचे निधन

वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चिपळूण (प्रतिनिधी) : धामणवणे गावचे माजी सरपंच, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते संभाजी जाधव यांचे सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने धामणवणे परिसरातील सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संभाजी जाधव यांनी १९७० ते २०१० अशी तब्बल ४० वर्षे आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहून काम केले. धामणवणे गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे गट) यामध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. चिपळूण पंचायत समितीचे सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.