वनविभागाशी संबंधित प्रलंबित अडचणी दूर; प्रकल्पाला आता गती मिळण्याची अपेक्षा
सावंतवाडी : माजगाव गावातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून पाहिलेले मिनी डॅमचे स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पातील प्रलंबित अडचणी दूर झाल्याने प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पाला २०१३ मध्ये केंद्र शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता. त्यानंतर सर्वेक्षण आणि सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, वनसंवर्धनाशी संबंधित काही खासगी क्षेत्रांच्या अडचणींमुळे प्रकल्प रखडला होता. आता याच महिन्यात शासनाचे चौथे आणि अंतिम पत्र प्राप्त झाल्याने संबंधित निर्बंध दूर झाले असून प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यासह खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांचे मोलाचे योगदान अआहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसह शेतकरी आणि वनविभागानेही या प्रक्रियेत सहकार्य केल्याचे नमूद करण्यात आले.
प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.
माजगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा मिनी डॅम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला बळ देतानाच शेती आणि स्थानिक नागरिकांना पाण्याचा मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांपासून पाहिलेले माजगाववासीयांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.













