दोडामार्ग | सुहास देसाई :कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे शेर्ले कापईवाडी येथील दिव्यांग तरुण सावळाराम सुदन धुरी याला मोठा दिलासा मिळाला आहे. नगराध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते सावळाराम याला नुकतीच चाकाची खुर्ची (व्हीलचेअर) प्रदान करण्यात आली.
सावळाराम हा पूर्णपणे दिव्यांग असून त्याला हालचालीसाठी व्हीलचेअरशिवाय पर्याय नाही. वाढत्या वयानुसार सावळाराम याला उचलून नेणे त्याची आई संज्योता धुरी यांच्यासाठी अत्यंत कठीण झाले होते. ही कौटुंबिक अडचण लक्षात येताच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तातडीने पुढाकार घेत त्याला व्हीलचेअर उपलब्ध करून दिली.
या उपक्रमावेळी माटणे मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, तालुका उपाध्यक्ष आनंद तळणकर, स्वीकृत नगरसेवक तथा दोडामार्ग शक्ती केंद्र प्रमुख समीर रेडकर, पोलिस मित्र पिंकी कवठणकर, तसेच संज्योता धुरी व प्रकाश धुरी उपस्थित होते. वेळेवर मिळालेल्या या महत्त्वपूर्ण मदतीबद्दल धुरी परिवाराने नगराध्यक्ष आणि सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.











