सावर्डे येथे झाड कोसळून वीजपुरवठा व वाहतूक खंडित

 केदारनाथ मंदिर परिसरातील नागरिकांची गैरसोय
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावर्डे येथील ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिराजवळील मध्यरात्री मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
रात्री अकराचे सुमारास झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिर, उदेगवाडी, स्मशानभूमी, शंकर मंदिर तसेच केदारनाथ कॉलनीकडे जाणारा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद झाला. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहनांची ये-जा थांबली होती स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. दरम्यान, झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला, परंतु मध्यरात्री महावितरण विभागातील कर्मचारी तेजस कुंभार, प्रसाद गुरव तन्मय बागवे, तसेच कर्मचारी संबंधित यंत्रणेकडून तातडीने भर पावसात व अंधारात दुरुस्तीचे काम हाती घेऊन सुमारे एक तासात विज तात्पुरती पूर्ववत करण्यास यश आले त्यामुळे ग्रामस्थांना अंधारातून दिलासा मिळाला, स्थानिक ग्रामस्थ आणि महावितरण प्रशासनाने आज सकाळी झाड हटवण्याचे काम हाती घेऊन वाहतूक सुरळीत केली तसेच वीजपुरवठा पक्का पूर्ववत करण्यासाठी महावितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वीज पुरवठा पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.