रामेश्वर सप्ताहनिमित्त आयोजन : विविध वेशभूषेतील युवकही होणार सहभागी
वेंगुर्ले : दाजी नाईक
श्री देव रामेश्वर भजनी सप्ताहानिमित्त बुधवार ५ ऑगस्ट रोजी सातव्या दिवशी रात्री काढण्यात येणाऱ्या दिंडी मध्ये श्री देव चौगुलेश्वर हौशी मित्रमंडळ, केरवाडा-शिरोडा यांच्या वतीने भगवान विष्णूंच्या वराह अवताराचा भव्य चित्ररथ सहभागी होणार आहे. त्याच बरोबर शहरातील काही युवक शंकर, कृष्ण, इंद्र, राक्षस अशा विविध वेशभूषा मध्ये दिंडीत सहभाग घेणार आहेत. तरी भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन रामेश्वर देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.
वेंगुर्ले येथील भजनी सप्ताहाचे हे १२६ वे वर्ष आहे. गेले सहा दिवस अखंड भजनी सप्ताहामुळे मंदिर परिसर भक्तीमय बनला आहे.
विविध मंडळी आपली भजन सेवा देवा चरणी अर्पण करत आहेत. देवदर्शनासाठी भाविकांची रोज गर्दी वाढत आहे.
दरम्यान उद्या सातव्या दिवशी रात्री ९ वाजता दाभोली नाका येथून दिंडीला प्रारंभ होणार आहे. ही दिंडी बाजारपेठ मार्गावरून रामेश्वर मंदिर येथे रात्री १२ वाजेपर्यंत पोहचणार आहे. या दिंडी मध्ये वराह अवतार चित्ररथ असणार असून शहरातील राजवाडा, दाभोसवाडा आणि विठ्ठलवाडी येथील युवक शंकर, इंद्र, राक्षस, अशी विविध वेशभूषा करून दिंडीत सहभागी होणार आहेत. दरवर्षी प्रमाणे वारकरी भजनी मंडळी हरिनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या तालावर भजन करतं दिंडी पुढे पुढे नेणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी रामेश्वर मंदिरा भोवती पालखी प्रदूषणाकडून काल्याने भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे.












