शहरी विभागात तृतीय क्रमांक मिळवत शिरगाव हायस्कूलची उज्ज्वल कामगिरी
शिरगाव (प्रतिनिधी) : शिष्यवृत्ती परीक्षेत शिरगाव हायस्कूलच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. समृद्धी सत्यवान सोये हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत तिने ३०० पैकी १८६ गुण मिळवत शहरी विभागात तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे शिरगाव हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एका उल्लेखनीय कामगिरीची भर पडली आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिरगाव हायस्कूलमधून एकूण चार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये समृद्धीने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवत शहरी विभागात तृतीय क्रमांक मिळविला. तिच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला निश्चितच बळ मिळाले आहे.
समृद्धीने नियमित अभ्यास, सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशामध्ये शिक्षकांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. तिला डी. एम. डवरी, के. व्ही. कदम आणि वाय. वाय. चव्हाण या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिरगाव परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिरगाव हायस्कूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुणभाई कर्ले, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, समृद्धीने भविष्यातही असेच यश संपादन करून शाळेचे व आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करावे, अशी विश्वास व्यक्त करण्यात आला .










