गणेश घाटाचे काम आमदार नीलेश राणेंच्या पाठपुराव्याने; श्रेय लाटण्याचा माजी आमदारांचा प्रयत्न : नगराध्यक्ष

वैभव नाईकांच्या पाहणी दौऱ्यावर प्राजक्ता बांदेकर-शिरवलकरांचा निशाणा;

“आमदार नीलेश राणे यांच्या कणखर व सक्षम नेतृत्वावर कुडाळकरांचा ठाम विश्वास”

कुडाळ : कुडाळ शहरातील बहुचर्चित गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे आले असताना माजी आमदार वैभव नाईक यांनी पाहणी दौरा करून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गणेश घाटाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आमदार नीलेश राणे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला असून, आता काम पूर्णत्वाकडे आल्यानंतर श्रेय घेण्याचा प्रयत्न म्हणजे “काम आम्ही केले नसले तरी श्रेय मात्र आम्हालाच मिळावे” या मानसिकतेचे उदाहरण असल्याची जोरदार टीका कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केली आहे.

गणेश घाटाचे काम पूर्वी मंजूर झाले असले तरी प्रत्यक्ष बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने काम रखडले होते. केवळ कामाला मंजुरी मिळणे आणि शासनाकडून प्रत्यक्ष निधी उपलब्ध होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. आमदार नीलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपंचायतीला प्रत्यक्ष बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आणि त्यानंतर गणेश घाटाच्या कामाला गती मिळाली, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

“गेल्या सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः या कामावर सातत्याने लक्ष ठेवले आहे. संबंधितांकडून कामाचा आढावा घेतला, अडचणी सोडविल्या आणि काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. एका दिवसाच्या पाहणी दौऱ्याने गणेश घाट उभा राहत नसतो; त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात,” असा टोला त्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांचे नाव घेतल्याशिवाय लगावला.

गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे आल्यानंतर झालेली पाहणी आणि त्यातून घेतले जाणारे श्रेय यावरही नगराध्यक्षांनी आक्षेप घेतला. “कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी कामासाठी प्रत्यक्ष निधी कोणी उपलब्ध करून दिला आणि कामाला गती मिळविण्यासाठी कोणी पाठपुरावा केला, हे कुडाळकरांच्या डोळ्यांसमोर आहे,” असे त्या म्हणाल्या.

माजी आमदार वैभव नाईक यांनी मागील दहा वर्षांच्या सत्ताकाळात कुडाळ शहरासाठी भरीव योगदान देऊ शकले नाहीत. आता स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि जनतेच्या नजरेत राहण्यासाठी सहानुभूती मिळविण्याची ही धडपड असल्याची टीकाही नगराध्यक्षांनी केली. सत्तेत असताना अनेक आश्वासने देण्यात आली; मात्र त्यातील किती पूर्ण झाली, याचा हिशेब जनतेसमोर असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुडाळकरांनी आमदार नीलेश राणे यांच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून शहराच्या विकासाची जबाबदारी त्यांच्या हाती सोपविली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीची टीम आणि सर्व नगरसेवक शहराच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहेत. “कुडाळकरांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. २१व्या शतकातील आधुनिक, सुंदर आणि विकसित कुडाळ घडविण्याचा दिलेला शब्द आम्ही निश्चित पूर्ण करू. आम्ही श्रेयासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष विकासासाठी काम करत आहोत,” असा विश्वास नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी व्यक्त केला.

गणेश घाटाचे डिझाईन आणि संकल्पना साधी, आकर्षक असून त्यातून कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच गणेश घाटाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षांनी सांगितले.