ओणी येथे ३१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा; नाव नोंदणीचे आवाहन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आई आधार केंद्र प्रायोजित कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर यांच्या स्मरणार्थ ‘कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी येथे पार पडणार आहे.
माध्यमिक शाळेतील मुलांच्या वक्तृत्व गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असून ती दोन गटांत घेतली जाईल. पहिला गट इयत्ता ५ वी ते ७ वी आणि दुसरा गट इयत्ता ८ वी ते १० वी चा असेल. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटासाठी दोन विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे आहेत: गट क्र. १ (इ. ५ वी ते ७ वी): ‘लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं’, ‘व्यक्तिमत्त्व विकास : गरज वाचनाची’, ‘मोबाईल आमच्या हाती की आम्ही मोबाईलच्या हाती’, ‘थेंब थेंब वाचवूया पाण्याचा’ आणि ‘अंधश्रद्धा वेशीवर टांगा, विज्ञानाची कास धरा’. गट क्र. २ (इ. ८ वी ते १० वी): ‘सोशल मीडियाचा वाढता पूर, नातीगोती झाली दूर’, ‘प्लास्टिकमुक्त भारत : माझी जबाबदारी, माझा संकल्प’, ‘गाव स्वच्छ तर देश स्वच्छ’, ‘जल, जंगले, जगवा; वसुंधरा वाचवा’ आणि ‘माझा आवडता पुस्तकांचा कप्पा : ज्ञानाचा खजिना’.
दोनोंही गटांतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास ₹४,०००, द्वितीय क्रमांकास ₹३,५०० आणि तृतीय क्रमांकास ₹३,००० यासह शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. नियम आणि नाव नोंदणी:स्पर्धेसाठी २५ ऑगस्ट २०२६ पूर्वी स्पर्धा संयोजकांकडे नावे नोंदवणे बंधनकारक आहे. त्यानंतर येणारी नावे स्वीकारली जाणार नाहीत. स्पर्धेसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क असून, वक्तृत्वाची वेळ किमान ५ ते कमाल ७ मिनिटे असेल. स्पर्धकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाईल. तरी जिल्ह्यातील शाळांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष एड. वासुदेव शंकर तुळसणकर यांनी केले आहे.