मंगला एक्स्प्रेसमध्ये झोपेचा फायदा घेत १ लाख २५ हजारांचा आयफोन चोरीला

कासरगोड ते कणकवली प्रवासादरम्यान घटना

अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार

कणकवली : कासरगोड येथून मुंबईला जाण्यासाठी मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या सौदी अरेबियात अभियंता म्हणून नोकरी करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा १ लाख २५ हजार रुपये किमतीचा आयफोन प्रवासादरम्यान चोरीला गेल्याची घटना घडली. झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सीटजवळ ठेवलेला मोबाईल चोरून नेल्याची तक्रार कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

मोहम्मद अशरफ एम.एच. अब्दुल रहिमान (वय २८, रा. आयशा मंजिल, पोस्ट-पटला, कासरगोड, केरळ) हे सौदी अरेबियामध्ये अभियंता म्हणून काम करतात. मुंबईला फिरण्यासाठी ते ३ ऑगस्ट २०२६ रोजी कासरगोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरून सायंकाळी ६.३० वाजता गाडी क्रमांक १२६१७ मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसमध्ये एस-६ कोचमधील सीट क्रमांक ७२ वरून प्रवासाला निघाले.

 

गाडी रात्री सुमारे १०.३० वाजता उडपी रेल्वे स्थानक पार झाल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल फोन बाजूच्या सीटवर ठेवला आणि झोपी गेले. झोपेतून जागे झाल्यानंतर बाजूच्या सीटवर ठेवलेला मोबाईल फोन दिसून आला नाही. त्यांनी डब्यामध्ये मोबाईलचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता गाडी कणकवली रेल्वे स्थानक पार होत असताना, झोपेचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरी केल्याची त्यांची खात्री झाली.

 

रत्नागिरी रेल्वे स्थानक सुटल्यानंतर टीसी गाडीत आल्यानंतर मोहम्मद अशरफ यांनी त्यांना मोबाईल चोरीची माहिती दिली.

 

चोरीस गेलेला मोबाईल आयफोन कंपनीचा आयफोन १७ प्रो मॅक्स असून तो निळ्या रंगाचा आहे. त्याची अंदाजे किंमत १ लाख २५ हजार रुपये आहे. मोबाईलमध्ये जिओचे सिमकार्ड तसेच सौदी अरेबियातील एसटीसी कंपनीचे सिमकार्ड होते. मोबाईलचे आयएमईआय क्रमांकही तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.

 

घटनेचे ठिकाण कणकवली रेल्वे स्टेशन-सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी सदर गुन्ह्याची मूळ कागदपत्रे पुढील तपासासाठी वरिष्ठ कार्यालयामार्फत कणकवली पोलीस ठाण्याकडे वर्ग केली आहेत. याबाबत कणकवली पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सुदेश तांबे करत आहेत.