२१ विद्यार्थी पात्र तर चार विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
सावंतवाडी :प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) २०२६ मध्ये सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडी अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेने अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेचे तब्बल २१ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी धारा महेंद्र कोरगावकर हिने जिल्ह्यात १४ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच कुमार वेद गोपाळ गवस याने २६ वा क्रमांक, कुमार चैतन्य प्रदीप सावंत याने २८ वा क्रमांक आणि कुमार कृष्णा उमेश पायशेठ याने ५० वा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरव सोहळा नुकताच शाळेच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालक श्री. स्वार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. प्रसाद गोठोस्कर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. भुरे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत सर उपस्थित होते. याशिवाय मोठ्या संख्येने पालकवर्ग, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी या सोहळ्यास उपस्थित होते.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर म्हणाले की, कळसुलकर शाळा म्हणजे गुणवत्तेची खाण आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामागे मार्गदर्शक शिक्षक श्री. डी. जी. वरक आणि सौ. स्मिता घाडीगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम महत्त्वपूर्ण ठरले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ आणि संजना आडेलकर यांचेही विशेष सहकार्य या यशासाठी लाभले. शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत ही देदीप्यमान कामगिरी केली आहे.
एकूण २१ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी झालेली पात्रता आणि चार विद्यार्थ्यांचे जिल्हा गुणवत्ता यादीतील स्थान यामुळे कळसुलकर प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे सावंतवाडी शहरासह सर्व स्तरांतून जोरदार अभिनंदन होत आहे.











