ड्युअल डिग्रीसह पीएचडीचीही संधी : प्रा. संजय थोरात
‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहोचवण्यासाठी मुक्त विद्यापीठ तत्पर
सावंतवाडी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिकृत मान्यता असून या विद्यापीठाच्या सर्व पदवी व पदव्युत्तर पदव्या इतर नियमित विद्यापीठांच्या पदव्यांशी पूर्णपणे समकक्ष आहेत. एकाच वेळी दोन पदव्या मिळवण्याची ‘ड्युअल डिग्री’ सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. संजय थोरात यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. थोरात यांनी सांगितले की, यूजीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमासोबतच संशोधन पदवी अर्थात पीएचडी करण्याची संधी पुन्हा एकदा मुक्त विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर विद्यापीठाचा भर असून ‘पोर्ट मॅनेजमेंट’सारखे आधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे. तसेच शिक्षण प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर विशेष भर दिला जात आहे. अभ्यासक्रमातील बदलांनंतर पहिल्या वर्षी संदर्भ पुस्तके मिळण्यास काही प्रमाणात विलंब होतो ही वस्तुस्थिती असली, तरी एका वर्षानंतर मात्र कोणतीही अडचण राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या पार्श्वभूमीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, १ जुलै १९८९ रोजी नाशिक येथे स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या पदव्या शासकीय सेवा आणि पदोन्नतीसाठी पूर्णपणे ग्राह्य धरण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. या विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर इतर विद्यापीठांमध्ये पुढील उच्च शिक्षण घेण्याची पूर्ण सुविधा उपलब्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ८ विभागीय केंद्रे आणि १ हजार ६७५ पेक्षा जास्त अभ्यासकेंद्रे कार्यरत असून, १४५ हून अधिक शिक्षणक्रमांमध्ये दरवर्षी साधारणपणे ३ लाख ७४ हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे बोधवाक्य असलेल्या या विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ‘कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित केले आहे.
कोल्हापूर विभागीय केंद्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण १२२० अभ्यासकेंद्रे सुरू असून जुलै २०२६ पासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या २२ अभ्यासकेंद्रे कार्यरत असून भविष्यात या जिल्ह्यात आणखी नवीन अभ्यासकेंद्रे सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांनी ycmou.digitaluniversity.ac.in किंवा ycmou.ac.in या संकेतस्थळाला भेट देऊन अथवा अभ्यासकेंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी विभागीय केंद्रात मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून ०२३१-२९९११७१, ०२३१-२९९११७२ किंवा ७४४७६०७०२२ आणि ७०३८६०७०२३ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून विविध शिक्षणक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन प्रा. थोरात यांनी केले. या पत्रकार परिषदेस सहाय्यक सल्लागार विजयसिंह रजपूत, केंद्र संयोजक तुषार वेंगुर्लेकर आणि यशवंत पाटील आदी उपस्थित होते.










