ना गोळीबाराचा आवाज, ना रिव्हॉल्व्हर; धमकीसाठी वापरली ती ‘टॉय आर्म’
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर परिसरात बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने काही काळ खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या तपासणीत धमकीसाठी वापरलेली बंदूक ही खरी नसून खेळण्यातील ‘टॉय आर्म’ असल्याचे निष्पन्न झाले. ही टॉय आर्म हवेच्या दाबावर चालणारी असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले आहे.
ही घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नॅशनल मेडिकल शेजारील कस्तुरी चायनीज सेंटर, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे घडली. साजिदा समीर काझी या त्यांच्या चायनीज सेंटरमध्ये असताना त्यांचे नातेवाईक नसीरा हरीस शेख, हरीस आदम शेख आणि संजय वासुदेव पुनतळेकर तेथे आले. त्यांच्यात वाद झाल्यानंतर शिवीगाळ करून बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. तेथे पोलिसांना बंदुकीसदृश वस्तू आढळून आली. पोलिस पथक आणि तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतर ती प्रत्यक्षात खेळण्यातील बंदूक असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवा अथवा अपूर्ण माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने केले आहे.











