आ. शेखर निकम यांच्या हस्ते शुभारंभ; नागरिकांनी लाभ घेण्याचे डॉ. विजय माटे यांचे आवाहन
चिपळूण (प्रतिनिधी) : मा. बाळासाहेब माटे प्रतिष्ठान, कामथे यांच्या वतीने कुंदाताई आणि लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी दि. १३ रोजी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. सालाबादप्रमाणे याहीवर्षी प्रसिद्ध उद्योजक तथा बाळासाहेब माटे प्रतिष्ठान, कामथेचे अध्यक्ष डॉ. विजय माटे यांच्या पुढाकाराने या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या अन्नदानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि या सेवाकार्यात सहभागी होण्याची संधी घ्यावी, असे आवाहन डॉ. विजय माटे यांनी केले आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी अन्नदान उपक्रमास शुभेच्छा दिल्या. समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने विविध सेवाभावी उपक्रम राबविणारे डॉ. विजय माटे यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांनी डॉ. माटे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी तसेच माटे परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मिलिंद कापडी, जयंत खताते, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप माटे, पांडुरंग माळी, श्री. वाजे, मोहन मिरगल, प्रदीप वाघूळदे, विराज माटे, सौ. पूनम माटे, कु. रिया माटे, सौ. विद्या माटे, कु. कुंदन माटे यांच्यासह माटे परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती यादव यांनी तर संकलनाची जबाबदारी संदीप थोरवडे यांनी पार पाडली. या उपक्रमाचे आयोजन डॉ. विजय माटे यांनी केले आहे. श्रावण मासानिमित्त आयोजित या अन्नदान उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या सेवाकार्यात सहभागी होण्याची संधी द्यावी, असे आवाहन आयोजक डॉ. विजय माटे यांनी केले आहे.












