चिपळूण (प्रतिनिधी) : मार्गतामणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात व वाचन कक्षात विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रंथ प्रदर्शनात प्रामुख्याने ‘कादंबरी’ या साहित्य प्रकारातील विविध पुस्तके मांडण्यात आली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. यादव सर म्हणाले की, “ग्रंथ हे विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. पुस्तकांच्या निरंतर वाचनामुळेच विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो.” तसेच विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता, महिन्याभरात किमान एक तरी अवांतर पुस्तक आवर्जून वाचावे, असा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाला प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.












