मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून दिली मंजूरी
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. उद्योग, गुंतवणूक व सेवा, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यातून हा निर्णय झाला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवरूखच्या ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालय होण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजूरी दिली आहे. याबद्दल देवरूखवासियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने आज (९ ऑक्टोबर २०२६) यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास “विशेष बाब” म्हणून मान्यता देण्यात आली आहे. श्रेणीवर्धित रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहित करून बांधकाम करणे आणि पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. देवरुख आणि संगमेश्वर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी दूर जावे लागू नये, यासाठी देवरुख येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व्हावे, यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शासन दरबारी सातत्यानं प्रयत्न सुरु ठेवले होते.
या निर्णयाबद्दल बोलताना डॉ. सामंत म्हणाले, “देवरुख आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या जवळच अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा आमचा प्रयत्न होता. हा निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा मनःपूर्वक आभारी आहे. पुढील सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील. तर देवरूखचे ग्रामीण रूग्णालय उपजिल्हा रूग्णालय होण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शेखरजी निकम, अनिकेत पटवर्धन यांच्या माध्यमातून देवरूखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, सहकारी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.













