भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सावंतवाडीत ८० सूर्यनमस्कार साधना शिबिर 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारत देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने शनिवारी सकाळी सावंतवाडी येथील जिमखाना हॉलमध्ये ‘८० सूर्यनमस्कार साधना शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले होते. सकाळी ५:३० वाजता सुरू झालेला हा उपक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. सीमा नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. नाईक म्हणाल्या की, जीवनात राष्ट्रप्रेमासोबतच नियमित योगाभ्यास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सावंतवाडीतील जास्तीत जास्त नागरिकांनी फिटनेस योग वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

या सोहळ्याला योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर, फिटनेस योग अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष श्री. नारायण सावंत, सचिव श्री. रवींद्र प्रभू देसाई, योग प्रचारक श्री. महेश परब, जिल्हा योग प्रचारक सौ. रुपाली पेडणेकर, सौ. मृणाल सावंत आणि सौ. उत्कर्षा पाटणकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

उद्घाटन सत्रानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते मागील शिबिरात उत्कृष्ट योगाभ्यास करणाऱ्या योगसाधकांना प्रशस्तीपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. यानंतर सर्व उपस्थित साधकांनी एकत्र येऊन शिस्तीत ८० सूर्यनमस्कार साधना पूर्ण केली. सूर्यनमस्कारांनंतर प्राणायाम सत्र पार पडले. याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी आणि समूहगीतांनी संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले होते.

या शिबिरात फिटनेस योग फाउंडेशन संचलित हिरकणी, महालक्ष्मी, वटसावित्री, एकमुखी दत्त मंदिर आणि वाटवे हॉल या ५ योगवर्गांतील योगशिक्षक व साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन राजन राणे यांनी केले, तर प्रास्ताविक सौ. रसिका सावंत यांनी मांडले. शेवटी उपस्थितांचे आभार सौ. चैताली गवस यांनी मानले.