पाटगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत रानडुक्कर मृत

देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांसह घटनास्थळी जात केली पाहणी

*देवरूख (प्रतिनिधी)

देवरूख-रत्नागिरी मार्गावर देवरूख नजीकच्या पाटगाव नटेवाडी येथे आज शनिवारी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत रानडुक्कर मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी जात मृत रानडुक्कराची पाहणी केली. यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करत या मृत रानडुक्करावर वनविभागाने अंत्यसंस्कार केले.

याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास मौजे पाटगाव नटेवाडी येथे देवरुख- रत्नागिरी रोडवर जाताना उजव्या बाजूला वन्यप्राणी रानडुक्कर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत अवस्थेत आढळून आले बाबत पोलीस पाटील पाटगाव यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनविभागाला कळविले. यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, वन्यप्राणी रानडुक्कर नर अज्ञात वाहनाची धडक लागून मृत अवस्थेत पडला असल्याचे आढळून आले. सदर मृत रानडुकराची पाहणी केली असता, त्याचे डाव्या बाजूच्या मानेजवळ अज्ञात वाहनाची जोरात धडक बसल्याचे व रक्त आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

तदनंतर सदर मृत रानडुकरास सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सदर मृत रानडुकराची देवरूख येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाँ. युवराज शेट्ये यांचेकडून शवविच्छेदन करून घेऊन सदर मृत रानडुकरास त्याचे सर्व अवयवासहित जाळून नष्ट केले. याबाबत वनपाल संगमेश्वर देवरुख यांनी त्यांच्याकडील प्र.गु. रि.क्रमांक – वप्रार / 2026 दिनांक-15/08/2026 अन्वये गुन्हा नोंद केला. परिमंडळ वनाधिकारी संगमेश्वर देवरुख श्री. सागर गोसावी , वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे, वनरक्षक साखरपा श्री सहयोग कराडे, वनरक्षक फुणगुस आकाश कडुकर व पंच उपस्थित होते.

घटनास्थळी स्थानिक श्री रवी गोपाळ व श्री रघुनाथ चिले यांचे सहकार्य लाभले. सदरची कार्यवाही माननीय विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती. गिरीजा देसाई मॅडम तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड मॅडम माननीय परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक- १९२६ किंवा 9096578761 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.