दोडामार्ग l प्रतिनिधी :भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘माऊली बॉईज कळणे’ या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या सामाजिक उपक्रमात तब्बल २५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती मा. श्री. गणेशप्रसाद गवस, कळणे-भिकेकोनाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रीमती सुषमा सावंत, उगाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री. सूर्यकांत गवस, श्री. अंकुश नाईक आणि ‘ऑनकॉल रक्तदाता संस्था सिंधुदुर्ग’चे श्री. बाबली गवंडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.या प्रसंगी ग्रामस्थ श्री. संजय देसाई, श्री. मनोज सावंत, श्री. संदेश देसाई, श्री. गिरीश नार्वेकर, श्री. केदार भिसे, श्री. सुहास देसाई, श्री. गौरेश देसाई, श्री. वैभव घोडगे, श्री. सिद्धू परब, श्री. जयराम देसाई, श्री. सौरभ डेगवेकर यांच्यासह कळणे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात १९ वर्षीय युवा रक्तदाता श्री. शुभम समीर देसाई याने केलेले रक्तदान. त्याच्या या उत्साहाचे सर्व मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले. रक्तदान करणाऱ्या सर्व २५ रक्तदात्यांचे तसेच सहकार्य करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे आणि उपस्थितांचे ‘माऊली बॉईज कळणे’ मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.












