काम लवकर पूर्ण न झाल्यास लांजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा
संतोष कोत्रे
लांजा: सालपे ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जल जीवन मिशन योजनेचे काम पाच वर्षांपासून सुरू असून ते पूर्ण न केल्याबद्दल सालपे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचे किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस संकेत घाग यांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषण करून संबंधित ठेकेदार आणि त्याला पाठीशी घालणारे अधिकारी यांचा जाहीर निषेध केला.
दरम्यान, जल जीवन योजनेचे काम हे प्राथमिक गरजांपैकी एक असून हे काम पूर्ण न झाल्यास आगामी काळात लांजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा संकेत घाग यांनी दिला आहे
सालपे गावात जल जीवन मिशन योजनेचे
हर घर नल योजना २०२१-२२ अंतर्गत काम सुरू होते. गेल्या पाच वर्षांपासून हे काम रखडलेल्या स्थितीत आहे. गावातील एकाही ग्रामस्थाला या योजनेअंतर्गत नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही. याबरोबरच सालपे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. तांडा वस्तीमधून आलेल्या रस्त्याचे काम इस्टिमेट प्रमाणे झालेले नसल्याचा आरोप देखील संकेत घाग यांनी केला असून यासाठी वापरण्यात आलेली खडी ,डांबर योग्य प्रमाणात वापरली केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तर मतदान केंद्र असलेल्या सालपे शाळा नंबर एक च्या इमारत दुरुस्तीचे काम देखील अपूर्ण आहे. सालपे येथील स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता अद्यापही झालेला नाही. स्मशानभूमीमध्ये शौचालय, पाणी व इतर सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. या ठिकाणी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मागणी करूनही झालेला नाही, सालपे बस स्टॉप या ठिकाणी प्रवासी निवारा शेड बांधली नाही. तसेच एचडीपी पाईप द्वारे शेतीला पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
या सर्व मागण्या संदर्भात गेल्या तीन वर्षांपासून सालपे ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावा करून देखील अद्यापही कार्यवाही झालेली नसल्याने संकेत घाग यांनी शनिवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाक्षणिक उपोषण करून याचा तीव्र शब्दात
निषेध केला. जल जीवन मिशन योजनेचे काम रखडलेले असतानाही संबंधित ठेकेदार व त्याला पाठीशी घालणारे अधिकारी यांचा आपण जाहीर निषेध करत असून आगामी काळात तातडीने या कामांची पूर्तता करावी अन्यथा या विरोधात लांजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा भाजपा पदाधिकारी संकेत घाग यांनी दिला आहे












