माध्यमिक विद्यामंदिर साळशीत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रम

निबंध, वेशभूषा व समूहगीत स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंतांचा गुणगौरव

शिरगांव (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे स्वातंत्र्योत्सवाचे औचित्य साधून १३ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तीन दिवसांच्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

१३ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक संजय मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर निबंध स्पर्धा झाली. लहान गटात आर्या महेंद्र राणे हिने प्रथम, चंदना प्रवीण राणे हिने द्वितीय, तर पारस संदीप वरेरकर याने तृतीय क्रमांक मिळविला. मोठ्या गटात सोहम प्रदीप घाडी प्रथम, धीरज विजय घाडी द्वितीय, तर सिद्धेश दयानंद राणे तृतीय ठरले. स्पर्धेचे परीक्षण जि. प. प्राथमिक शाळा सरमळेवाडीचे मुख्याध्यापक समाधान कोळी यांनी केले.

१४ ऑगस्ट रोजी स्कूल कमिटीचे चेअरमन सत्यवान भोगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वेशभूषा स्पर्धा पार पडली. आर्या महेंद्र राणे हिने प्रथम, धीरज विजय घाडी याने द्वितीय, तर चंदना प्रवीण राणे हिने तृतीय क्रमांक मिळविला. गौरी मंगेश नाईक व ओंकार राजन गावकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण जि. प. प्राथमिक शाळा सरमळेवाडीचे मुख्याध्यापक समाधान कोळी व देवणेवाडी अंगणवाडी सेविका प्रतीक्षा शिवलकर यांनी केले.

१५ ऑगस्ट रोजी प्रभातफेरीनंतर मुख्य ध्वजारोहण समारंभ झाला. इयत्ता दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आलेली तसेच इंग्रजी विषयात ९८ गुण मिळविणारी गुणवंत विद्यार्थिनी हिमानी चंद्रकांत घाडी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संगीत कवायत झाली. देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत इयत्ता दहावी प्रथम, इयत्ता नववी द्वितीय, तर इयत्ता आठवी तृतीय ठरली. स्पर्धेचे परीक्षण जि. प. प्राथमिक शाळा सरमळेवाडीचे मुख्याध्यापक समाधान कोळी यांनी केले.

यावेळी कै. सिद्धी मराठे स्मृती पारितोषिक वितरण समारंभही झाला. या प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मराठे व त्यांच्या कुटुंबीयांकडून दरवर्षी देण्यात येणारी स्मृती पारितोषिके यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात प्रदान करण्यात आली. इयत्ता आठवीतील यश सचिन मोंडकर, इयत्ता नववीतील धीरज विजय घाडी आणि इयत्ता दहावीतील हिमानी चंद्रकांत घाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवून ही पारितोषिके पटकावली.

संपूर्ण कार्यक्रम व स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन पुरुषोत्तम साटम यांनी केले.

या सोहळ्यास साळशी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सत्यवान सावंत, स्कूल कमिटीचे चेअरमन सत्यवान भोगले, शाळेचे आधारस्तंभ किशोर लाड, साळशी ग्रामपंचायत सदस्या आदिती रावले, मुख्याध्यापक संजय मराठे, जि. प. प्राथमिक शाळा सरमळेवाडीचे मुख्याध्यापक समाधान कोळी, देवणेवाडी अंगणवाडी सेविका प्रतीक्षा शिवलकर, शिक्षक पुरुषोत्तम साटम, स्वप्निल भरणकर, शिपाई सदाशिव भिसे, सर्व शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.