पेंढरी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

विविध उपक्रमांसह विद्यार्थी गौरव, वृक्षारोपण व सामाजिक बांधिलकीचा संदेश

शिरगांव (प्रतिनिधी ): पेंढरी ग्रामविकास मंडळ, पेंढरी संचलित पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध शैक्षणिक, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पेंढरी ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे पदाधिकारी श्री. मंगेश तिर्लोटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी सामूहिकरीत्या वंदे मातरम्, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व ध्वजगीताचे गायन केले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी नशामुक्त, कॉपीमुक्त, टी.बी.मुक्त, कुष्ठरोगमुक्त व तंबाखूमुक्त समाज तसेच साक्षरतेच्या शपथा घेतल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन तिरंगा रॅली व प्रभातफेरी काढली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

पेंढरी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद सोमले व मालक सोमले कॅशू यांच्या वतीने आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ११००, ७०० व ५०० रुपये रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन देण्यात आले.

दीर्घकाळ अंगणवाडी सेविका म्हणून सेवा बजावून दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सेवानिवृत्त झालेल्या सौ. शारदा गुरव यांना संस्थेच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. साडी, ओटी, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सौ. गुरव यांनी अंगणवाडी व प्राथमिक शाळेस प्रत्येकी एक समई भेट दिली, तर माध्यमिक विद्यालयास ५ हजार रुपयांची देणगी दिली.

पेंढरी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्या वतीने ‘प्रति विद्यार्थी व शिक्षक एक झाड’ हा अभिनव वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. अंगणवाडीपासून माध्यमिक विद्यालयापर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले. सहभागी प्रत्येकाला त्यांच्या छायाचित्रासह छापलेला ‘मग’ स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास बॉक्स, पॅड आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी श्री. संदीप गुरव यांचेही मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास सरपंच श्री. मंगेश आरेकर, पेंढरी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद सोमले, उपाध्यक्ष श्री. सत्यवान मनचेकर, सचिव श्री. मंगेश गुरव, पेंढरी ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे अध्यक्ष श्री. अनंत गुरव यांच्यासह संजय घाडी, राकेश घाडी, अजय गिरकर, मंगेश तिर्लोटकर, योगेश गुरव, अजय घाडी, किरण तिर्लोटकर, अरविंद गुरव, अनंत गुरव, प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष श्री. संतोष आरेकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष तांबे, माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रुपेश बांदेकर यांनी केले, तर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सत्यपाल लाडगांवकर यांनी आभार मानले. उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांसाठी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, विद्यार्थी गौरव आणि राष्ट्रप्रेमाची जोड देत पेंढरी विद्यालयाने स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा केला.