शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपले
चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद दोणवली शिर्केवाडी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका, कोंढे बौद्धवाडी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वासंती दाजी व्यवहारे यांचे सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्या ८० वर्षांच्या होत्या.
त्यांच्या निधनाने कोंढे परिसरासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दिवंगत वासंती व्यवहारे या एस.टी महामंडळाच्या यांत्रिकी विभागातील कर्मचारी विजय व्यवहारे व शिक्षक जयकुमार व्यवहारे यांच्या त्या मातोश्री होतं. वासंती व्यवहारे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात चिपळूण तालुक्यातील मालघर नं. १, कोंढे, दोणवली, तसेच गुहागर तालुक्यातील पालपेणे व जानवळे आदी शाळांमध्ये शिक्षिका म्हणून जबाबदारी पार पाडली. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि आपुलकीच्या वागणुकीने त्यांनी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातही आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. सेवाकाळात त्यांनी मुख्याध्यापिका म्हणूनही सक्षमपणे कार्य केले. पती दाजी व्यवहारे यांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी अत्यंत खंबीरपणे सांभाळत आपल्या मुलांना योग्य संस्कार व शिक्षण दिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा सामाजिक कार्यातील सहभाग कायम राहिला. गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. गावातील विकासात्मक कामांबाबत त्या नेहमी जागरूक आणि आग्रही असत. गावातील सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी त्या आपुलकीने सहभागी होत असत.
अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागणाऱ्या वासंती व्यवहारे यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, कुटुंबीयांनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, दि. १७ जून रोजी त्यांचा ८० वा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला होता. कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण ठरला; मात्र नियतीच्या कठोर निर्णयाने तोच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा वाढदिवस ठरला. सोमवार सकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर कोंढे बौद्धवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी कोंढे येथील त्यांच्या निवासस्थानी जलदान विधी व शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांना घडविणाऱ्या आणि सेवानिवृत्तीनंतरही गावाच्या विकासासाठी कार्यरत राहिलेल्या वासंती व्यवहारे यांच्या निधनाने एक प्रेमळ शिक्षिका, कर्तव्यदक्ष माता आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.













