देवगड : ८४ वर्षीय वृद्धावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; पत्नीही जखमी

गायीचे दूध काढण्यावरून वाद; डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर दुखापत

सोडविण्यास गेलेल्या ७० वर्षीय पत्नीवरही हल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

देवगड तालुक्यातील दहिबाव-बावकरवाडी येथे गायीच्या मालकीवरून तसेच गायीचे दूध काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ८४ वर्षीय वृद्धावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वृद्धासह त्यांची ७० वर्षीय पत्नीही गंभीर जखमी झाली. याप्रकरणी देवगड पोलिसांनी अक्षय चंद्रकांत बावकर (वय ३२, रा. बावकरवाडी, दहिबाव, ता. देवगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मधुकर रामजी बावकर (वय ८४) हे दहिबाव-बावकरवाडी येथील देवघराच्या बाजूला गायीचे दूध काढत होते. त्यावेळी गायीच्या मालकीवरून आणि दूध काढण्याच्या कारणावरून आरोपी अक्षय बावकर याच्याशी वाद झाला. या रागातून आरोपीने मधुकर बावकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच लाकडाने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.

पतीला सोडविण्यासाठी आनंदी मधुकर बावकर (वय ७०) या पुढे गेल्या असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर तसेच डाव्या हाताच्या बोटांवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले.

दरम्यान, आरोपी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत असताना त्यांचा पुतण्या चंद्रकांत विठ्ठल बावकर हा सोडविण्यासाठी आला. त्यावेळी आरोपीने हातात कोयता घेऊन त्याच्यावर हल्ला करण्यासाठी धावून गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी आनंदी मधुकर बावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११८(२), १३१, ३५१(२)(३) व ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा १८ ऑगस्ट रोजी पहाटे ००.५५ वाजता दाखल करण्यात आला. आरोपी अक्षय बावकर पोलिसांच्या ताब्यात असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.