कोसुंब येथे सहयोगी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या काजू प्रक्रिया युनिटचे भूमिपूजन
देवरूख (प्रतिनिधी):
बचत गटाच्या माध्यमातुन महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातुन एक चळवळ उभी राहली आहे. त्यातुन महिला आर्थिक स्वावलंबी बनण्यास मदत होत आहे.या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणुन संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे महिलांची सहयोगी महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. महिलांची जिह्यातील ही पहिली कंपनी ठरली आहे. या सहयोगी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्मार्ट प्रकल्पाचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत ५८ लाख ४१ हजार रुपये मंजुरी मिळाली आहे.
तालुक्यातील कोसुंब येथील सहयोगी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्मार्ट प्रकल्पाचा मंजूर झालेल्या काजू प्रक्रिया युनिट शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोसुंब येथे उत्साहात पार पडले. संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये आणि कंपनीच्या अध्यक्षा सौ. पूनम लिंगायत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती प्रफुल्ल बाईत, ओझरे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेहा माने, कोसुंब गणाच्या पंचायत समिती सदस्या दुर्वा पाष्टे, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पंचायत समिती संगमेश्वरचे गटविकास अधिकारी अक्षय पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक रुपेश चव्हाण, तालुका व्यवस्थापक राठोड , प्रभाग समन्वयक स्वप्नील बारगुडे, कोकण कलश कंपनीच्या अध्यक्षा ज्योती जाधव, सचिव सौ. धावडे, ॲग्रो स्टार कंपनीचे अध्यक्ष शेलार, कृषी सहाय्यक यादव नांदळजचे सरपंच दिलीप गोवळकर, संघर्ष प्रभाग संघाच्या अध्यक्षा सुहासिनी पांचाळ, श्रुती लोध तसेच प्रायमो संस्थेच्या हर्षदा मोवळे यामान्यवरांसह कंपनीच्या संचालक नेहा गोवळकर, आदिती जाधव, प्रियंका जाधव, सुहासिनी भाताडे, संजना झेपले, प्रज्ञा कांबळे, शर्मिला कांबळे या उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ नेहा माने यांनी महिलांनी नवीन व्यवसायांमध्ये उतरून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन होत असल्याने आंब्यावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. श्री रोहन बने यांनी कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कंपनीला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. पंचायत समिती उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनी सहयोगी कंपनी आपल्या गणातील असून जिल्ह्यातील पहिल्या अशा प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मान मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच महिलांना आवश्यक ते सर्व शासकीय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी अक्षय पाटील यांनी महिलांनी कंपनीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कंपनीच्या कामकाजासाठी आवश्यक प्रशासकीय सहकार्य आपल्या स्तरावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पंचायत समिती सभापती सौ. शर्वरी वेल्ये यांनी महिलांनी कंपनीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत तसेच भविष्यात विविध व्यवसाय उभारावेत, असे आवाहन केले. यासाठी पंचायत समितीमार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्रभाग समन्वयक महेंद्र जाधव यांनी सहयोगी महिला शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये एकूण ५०५ सभासद व १० संचालक असल्याची माहिती दिली. स्मार्ट प्रकल्पांतर्गत कंपनीला ५८ लाख ४१ हजार रुपयांचा प्रकल्प मंजूर असून त्यामध्ये ६० टक्के स्मार्ट अनुदान आणि ४० टक्के स्वनिधी व बँक कर्जाच्या माध्यमातून निधी उभारणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच कंपनीने यावर्षी २ टन मिरची आणि २२ टन कांद्याची विक्री केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. काजू प्रक्रिया युनिटच्या माध्यमातून महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार व उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होऊन कंपनीच्या व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सहयोगी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा सौ. पूनम लिंगायत यांनी उपस्थित मान्यवर, महिला सभासद, संचालक मंडळ व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. महिलांच्या एकत्रित प्रयत्नातून कंपनीला भविष्यात अधिक सक्षम व यशस्वी बनविण्याचा संकल्प यावेळी केला.












