शांतता समिती बैठकीत सण-उत्सव, सीसीटीव्ही अन् वाहतूक कोंडीवर चर्चा

सावंतवाडी । प्रतिनिधी :कोकणातील जनता अत्यंत सजग असून सर्व सण व परंपरा गुण्यागोविंदाने आणि शांततेत साजरे करते, हीच येथील खरी ताकद आहे. त्यामुळे आगामी जन्माष्टमी, दहीहंडी व अन्य सर्व सण शांततेत साजरे करा, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनी केले. सावंतवाडी येथे आगामी काळातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, पत्रकार सीताराम गावडे, सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, नगरपरिषद सभापती मोहिनी मडगावकर, सीए चिन्मय रानडे, सावंतवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते बावतीस फर्नांडिस, हिदायतुल्ला खान, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, दैवज्ञ संघाचे राजेश पनवेलकर, पोलिस हवालदार अमित राऊळ आणि नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत ईद-ए-मिलादच्या सावंतवाडी शहर व कोलगाव येथील मिरवणुकीसह रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सवाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. शहरात एकूण २० दहीहंडी आणि राजकीय दहीहंडींचे आयोजन होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
*शहर वाहतूक व सीसीटीव्ही यंत्रणेवर जोर*
बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी आणि बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न नागरिकांनी लावून धरला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बंद कॅमेऱ्यांबाबत संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सीसीटीव्हीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आल्याची माहिती दिली. सावंतवाडी शहरात नवीन बुलेट कॅमेरे बसवण्यासाठी सर्व्हे करून बजेट घेण्यात आले असून लोकवर्गणीतून हे कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न आहे. वाहतूक नियंत्रणासाठी माईक यंत्रणा वापरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी नगरसेवक गोविंद वाडकर यांनी आगामी शांतता समितीच्या बैठकांना नगरपालिका अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवण्याची मागणी केली, जेणेकरून समाजमंदिरासमोरील रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटू शकेल. यावर मोहिनी मडगावकर यांनी नगरपालिकेकडून शहरात पार्किंगची व्यवस्था केली जात असल्याचे सांगितले.
तर गांधी चौक आणि नगरपालिका बस स्टॉप परिसरातील वाहनांचा अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले. राजेश पनवेलकर यांनी शहरात वन-वे वाहतूक सुरू करण्याची सूचना केली. त्यावर नगरपालिका वन-वेबाबत आवश्यक कार्यवाही करत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनी नमूद केले.
पत्रकार सीताराम गावडे यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काळ्या काचा लावून फिरणाऱ्या गाड्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. अफरोज राजगुरू यांनी बाहेरीच्या वाड्यांमध्ये मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना केली. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी सर्व संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून संयुक्त बैठक घेण्यात यावी, असा निर्णय बैठकीच्या शेवटी घेण्यात आला.













