उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते झाले उद्घाटन
चिपळूण (वार्ताहर) : चिपळूणकरांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शहरात जिल्हास्तरीय सर्व न्यायिक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि दावे जलद गतीने निकाली निघण्यासाठी ‘दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर’ ची स्थापना झाली असून, मुंबई उच्च न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते याचे नुकतेच थाटात उद्घाटन झाले. वकील संघाच्या पाठपुराव्यामुळे हे न्यायालय लवकरात लवकर साकारले असल्याचे गौरवोद्गार यावेळी न्यायमूर्तींनी काढले.
चिपळूण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर चिपळूण न्यायालय याचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. न्यायालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील कार्यक्रम चिपळूण शहरातील शिक्षक पतपेढीच्या सभागृहामध्ये पार पडला. संविधान प्रस्ताविकेचे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव होते. या कार्यक्रमाला उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती हितेन एस वेणेगावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रत्नागिरी विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चिपळूण न्यायाधीश गौतम दिवाण, चिपळूणचे न्यायाधीश, वकील संघ चिपळूणचे अध्यक्ष नितीन सावंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे बोलताना न्यायमूर्ती माधव जामदार म्हणाले की, चिपळूणसारख्या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर चिपळूण न्यायालयाची स्थापना झाल्यामुळे निश्चितच वेगवेगळ्या पक्षकारांना आणि चिपळूणकरांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जलद गतीने दाव्यांचा निपटारा करण्यासाठी सुद्धा न्यायालयाचा उपयोग होणार आहे. यावेळी त्यांनी बोलताना संविधानातील अनुच्छेद २१ याचे महत्व सांगितले. नागरिकांचा जगण्याचा अधिकार व प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार त्याचप्रमाणे अनुच्छेद २१ नुसार परिणामकारक अंमलबजावणी करत दाद मागण्याचा अधिकार सुद्धा अनुच्छेद २१ नुसार नागरिकांना मिळतो. यासाठी आपण सजग असले पाहिजे आणि संविधानिक बाबींचा अभ्यास करणे ही महत्वाचे आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचे भान राखत निश्चितच या नूतन न्यायालयामध्ये उत्तम कामकाज केले जाणार आहे. त्याचबरोबर मंडणगड येथे न्यायालय सुरू झाल्यानंतर दोन वर्षात नवीन इमारत बांधण्यात आली. त्याचप्रमाणे चिपळूण व खेड यांच्यासाठी सुद्धा न्यायालयासाठी एक उत्तम जागा बघून बांधकाम झाले पाहिजे. हे मोठे काम आहे. निश्चित याला काही कालावधी लागणार आहे. यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर चिपळूण येथे बार कौन्सिलचची स्वतंत्र इमारत असली पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक वकिलाला एक स्वतंत्र जागा बसण्यासाठी मिळणे अपेक्षित आहे. जूनियर आणि सीनियर या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे.
यावेळी त्यांनी चिपळूण विषयी प्रेम, ग्रामीण भागातील संस्कृती आणि येणाऱ्या अडचणी यावर सुद्धा भाष्य केले. त्याचबरोबर उच्च न्यायालय न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून सांगितले की, सह्याद्रीच्या कुशीत चिपळूण वसलेले आहे. सुन्दर निसर्ग सौंदर्य लाभलेले हे ठिकाण आहे. त्यामुळे निश्चितच एका प्रगतशील आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चिपळूण न्यायालय सुरू होत आहे ही एक गौरवशाली बाब आहे. इथल्या नागरिकांसाठी ही उत्तम सेवा असणार आहे. मात्र, आपल्या खांद्यावर तेवढीच महत्वपूर्ण जबाबदारी सुध्दा आली आहे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. नितीन सावंत यांनी करताना हे न्यायालय सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला रत्नागिरी येथून ॲड. पाटणे, चिपळूण न्यायालयातील सर्व न्यायाधीश वर्ग, वकील आणि शहरातील नागरिक सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. नयना पवार यांनी केले.













