सहकारातून सामाजिक बांधिलकी कुणबी विकास पतसंस्थेची ३० वर्षांची यशस्वी घोडदौड

 चिपळूण शाखेचा चौथा वर्धापन दिन साजरा
चिपळूण (वार्ताहर) : सहकार क्षेत्रात गेली ३० वर्षे खंबीरपणे कार्यरत असलेली कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा हि यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. सहकारातून सामाजिक बांधिलकी जपताना सभासदांच्या पसंतीस उतरली आहे. यातूनच आता पर्यंत ९५ कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांनी दिली. चिपळूण बहादुरशेख नाका येथील साई प्लाझा येथे कुणबी विकास सहकारी पतसंस्था लांजा या संस्थेच्या चिपळूण शाखेचा चौथा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना श्री. परवडी म्हणाले की, पतसंस्थेची चिपळूण येथे शाखा सुरू झाल्यानंतर चिपळूणकरांनी उत्तम सहकार्य केले आहे. या शाखेचे ८१५ सभासद झाले असून सुमारे ५ कोटी ठेवी या शाखेत सभासदानी ठेवल्या आहेत. अजूनही या शाखेचे कामकाज वाढविण्यासाठी संचालक मंडळ विविध योजना आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या ३० वर्षाची पतसंस्थेची वाटचाल पाहता ११ हजार सभासद असून ९५ कोटींच्या ठेवी आहेत. त्याचबरोबर संस्थेने ६५ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेच्या सभासदांना ११ टक्के लाभांश सुद्धा पतसंस्थेने दिला आहे. या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपताना विद्यार्थी गुणगौरव, जेष्ठ सभासद सन्मान, मुख्यमंत्री सहाय्यात निधीला अर्थसाह्य, सभासद पाल्याचा गौरव अशा अनेक कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यातूनच संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले. चिपळूण शाखेच्या चौथ्या वर्धापन दिनी सभासद पाल्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डीबीजे महाविद्यालयाचे प्रा. महेश जठार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विलास दरडे यांनी केले. या कार्यक्रमाला संचालक नंदकुमार आंबेकर, भालचंद्र कांबळे, कुणबी समाज नेते दादा बैकर, नगरसेवक संजय गोताड, कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूण अध्यक्ष ॲड संतोष कुळे, प्रा. महेश जठार, रतन पवार, दीपक निवाते, भरत धुलप, मधुकर मते, संतोष राणे, श्री. हरावडे, संजय जाबरे, प्रदीप उदेग,चिपळूण शाखाधिकारी सचिन रामाणे, शुभम जोगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सी ओ श्री. डफळे यांनी केले.