कुणबी-८३ अंतर्गत पोटजात म्हणून समावेशाची मागणी
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद
चिपळूण (वार्ताहर) : कोकणातील डोंगर कुणबी अर्थात डोंगरी कुणबी समाजाचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील कुणबी-८३ अंतर्गत पोटजात म्हणून समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी कुणबी समाजाचे नेते तथा माजी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे ठामपणे पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा दौरा व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धैर्यशील पाटील यांनी डोंगर कुणबी समाजाच्या प्रलंबित मागणीचे गांभीर्य आयोगाच्या सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले.
कोकणातील विविध भागांत डोंगर कुणबी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, या समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शासनाच्या आरक्षण व विविध कल्याणकारी योजनांचा योग्य लाभ मिळणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. डोंगर कुणबी समाजाचा कुणबी-८३ अंतर्गत पोटजात म्हणून समावेश झाल्यास समाजातील नागरिकांना ओबीसी प्रवर्गातील आरक्षण तसेच शासनाच्या विविध योजनांचा अधिक प्रभावीपणे लाभ घेण्याचा मार्ग सुकर होईल, असे पाटील यांनी आयोगासमोर स्पष्ट केले. समाजाची पारंपरिक ओळख, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक स्थिती आणि आर्थिक मागासलेपणाचा विचार करून शासनस्तरावर योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
बैठकीदरम्यान समाजाच्या वतीने डोंगर कुणबी समाजाशी संबंधित विविध मुद्दे आयोगाच्या सदस्यांसमोर मांडण्यात आले. या प्रश्नाचा केवळ बैठकीपुरता पाठपुरावा न करता, समाजाला न्याय मिळेपर्यंत शासन आणि आयोगाच्या पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याची भूमिका धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केली. आवश्यक कागदपत्रे, ऐतिहासिक संदर्भ आणि उपलब्ध माहिती आयोगासमोर सादर करून या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, डोंगर कुणबी समाजाच्या मागणीवर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या मागणीला पुढील काळात गती मिळण्याची आशा समाजबांधवांमध्ये निर्माण झाली आहे. आयोगाकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे आता समाजाचे लक्ष लागले आहे.
या बैठकीस कुणबी समाजाचे नेते शंकर म्हसकर, शिवराम महाबळे, मुरुडचे संतोष पाटील, हरिचंद्र पाटील, चापडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. डोंगर कुणबी समाजाच्या प्रश्नासाठी आयोगासमोर ठाम भूमिका मांडल्याबद्दल उपस्थित समाजबांधवांनी धैर्यशील पाटील यांचे आभार मानले. डोंगर कुणबी समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा विचार करून शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे कुणबी-८३ अंतर्गत पोटजात म्हणून डोंगर कुणबी समाजाच्या समावेशाबाबत शासन व आयोगाकडून पुढे कोणती कार्यवाही केली जाते, याकडे कोकणातील समाजाचे लक्ष लागले आहे.













