खेड (प्रतिनिधी) : गेली तीस वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना उत्सवांच्या माध्यमातून नागरिकांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. कोणतेही काम करायचे असेल तर ते मनापासून आणि भरभरून करण्याची आपली भूमिका राहिली आहे. आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर याच उत्सवांच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे भाजप नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले.
दहीहंडी, गणपती आणि नवरात्रोत्सव हे आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अधिक जल्लोषात आणि वेगळ्या स्वरूपात साजरे करण्याचा मानस असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. यंदाच्या दहीहंडी उत्सवाला विशेष स्वरूप देण्यात येणार असून, पारंपरिक संस्कृतीसोबत आधुनिकतेची सांगड घालत साहसी क्रीडा प्रकार म्हणून दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे.
यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे प्रथम पारितोषिक तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपये ठेवण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या थरांनाही प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय शरीरसौष्ठव स्पर्धा, स्थानिक कलाकारांच्या नृत्याचा कार्यक्रम तसेच एलईडीच्या माध्यमातून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खेडेकर यांनी दिली.
“दहीहंडीच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीचा ठेवा लोकांसमोर ठेवतो. उंच मनोरे रचताना सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. याचबरोबर उत्सवाला वेगळे स्वरूप देण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे,” असे खेडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘सालटी गेली तरी चालतील, रुतबा कायम राहिला पाहिजे’ हा संदेश चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत बोलताना खेडेकर यांनी गेल्या तीस वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा संदर्भ दिला. कार्यकर्त्यांकडे मोठी आर्थिक साधने नसतानाही लोकांसाठी आणि उत्सवांसाठी काहीतरी चांगले करण्याची भूमिका कायम राहिली असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्सवांच्या आयोजनासाठी अनेकदा कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले, कर्ज काढले किंवा उसनवारी करून कार्यक्रम उभे केले. मात्र नागरिकांनीही या उपक्रमांना आर्थिक आणि सामाजिक स्वरूपात भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे ‘सालटी गेली तरी चालतील, पण रुतबा कायम राहिला पाहिजे’ हा केवळ व्हॉट्सॲप स्टेटस नसून कार्यकर्त्यांच्या जिद्दीचा संदेश असल्याचे खेडेकर यांनी स्पष्ट केले.
यंदाचा दहीहंडी उत्सव मागील वर्षांपेक्षा कितीतरी पटीने अधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत. खेडवासीय दरवर्षी उत्सवांना भरभरून प्रतिसाद देतात आणि यंदाही त्याच उत्साहात नागरिक सहभागी होतील, असा विश्वास भाजप नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला.













