देवगड : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवा महोत्सवात नृत्य या कलाप्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत लोकनृत्य प्रकारात सुवर्णपदक मिळवून ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’चा मान पटकावणाऱ्या श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडचा ५९व्या युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दि. २४ ऑगस्ट रोजी भव्य सन्मान करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियममध्ये आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते बोमन इराणी आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या शुभहस्ते श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाला भव्य ट्रॉफी, राजाबाई टॉवरची प्रतिकृती आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरविण्यात आले.
या गौरव सोहळ्याप्रसंगी श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक सहसमन्वयक डॉ. नितीन वळंजू तसेच विद्यार्थी साहिल जाधव उपस्थित होते.
याच कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक सहसमन्वयक तसेच श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. नितीन वळंजू यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाने युवा महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, लोकनृत्यातील सुवर्णपदकासह मिळविलेली ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ ही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या उत्कृष्ट कार्याची पावती आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ, देवगडचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












