राजापूर प्रतिनिधी: राजापूर नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन वर्षानिमित्त महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कौशल्य प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
दि. २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषदेच्या जवाहर चौकातील पिकअप शेड येथे सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. या शिबीराचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या हस्ते झाला. . यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शबाना मुल्ला, उपसभापती जान्हवी वादक, समिती सदस्य उर्मिला बाकळकर, सुयोगा जठार व अमिना गडकरी तसेच नगरसेविका सान्वी रावण, साजिया काझी, प्रेरणा नार्वेकर, नेहा तानवडे आदी उपस्थित होत्या. या महिला नगरसेविकांनी यावेळी सरस्वती तसेच क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.
या प्रशिक्षणासाठी जालगाव, दापोली येथील राज फाउंडेशनचे संस्थापक संतोष गाटे व सहाय्यक आयुष दाभोळकर यांनी उपस्थित महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. यामध्ये विविध प्रकारच्या मेणबत्त्या, लिक्विड, फिनेल, अगरबत्ती, सेंट, फुलांची सजावट तसेच विविध प्रकारचे मसाले तयार करण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांनी महिलांनी अशा कौशल्य प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, प्रशिक्षण पूर्ण करून त्यातून स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास नगरपरिषदेच्या वरिष्ठ लिपिक अनुष्का जुवेकर, समुदाय संघटक पूर्वा कांबळे, स्नेहा गार्डी, गायत्री बाकळकर, अवनी पवार, नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना घरगुती पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीतून विविध उत्पादने तयार करून त्याचे व्यवसायात रूपांतर करण्याची दिशा या प्रशिक्षणातून मिळाल्याने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
Home महत्वाच्या बातम्या राजापूर नगर परिषद आयोजित कौशल्य प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद













